हा आजचा लेख ५०० वा त्यानिमित्ताने …
" इतरांच्या अंतर्यामी खोलवर बघा आणि ऐका,फक्त कानांनी नाही,आपली हृदयं आणि कल्पनाशक्तीनं, आणि आपल्या मूक प्रेमानं " - जॉय कानेलाकोस
पुस्तकांसोबत जीवन जगत गेलो,आणि जीवन समजत गेले.मी जो आहे जसा आहे,तो फक्त पुस्तकांमुळे…
माझ्या आयुष्यात पुस्तकाचे येणे मी त्याला जवळ घेणे,आणि त्याने मला आयुष्यभरासाठी जवळ घेणे,माझ्यासाठी तर हे संपूर्ण आयुष्य हेच आहे. - मॅट्रिक फेल विजय गायकवाड
पुस्तकांना सोबत घेऊन आपल्या सर्वांसोबत करत असलेला हा प्रवास खरोखरच विलोभणीय आहे.त्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार व धन्यवाद पुस्तक निर्मितीमध्ये असणाऱ्या सर्वांचे तसेच लेखक प्रकाशक त्यांचेही विशेष आभार…
५०० लेखांचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल विजय गायकवाड यांना मनःपूर्वक शुभेच्छा!
परिस्थिती कितीही कठीण असली,तरी जो वाचन आणि लेखनाचा ध्यास ठेवतो,तोच खरा यशस्वी लेखक ठरतो. माझे प्रिय मित्र विजय गायकवाड,ज्यांनी मॅट्रिक फेल या टोपणनावाने आपला स्वतंत्र ठसा उमटवला,त्यांनी आज आपल्या ब्लॉगवर ५०० व्या लेखाचं गोलंदाज यश गाठलं आहे — हे खरंच अभिमानास्पद आहे. मराठी भाषेचा गंध जागतिक पातळीवर पोहोचवण्याचं कार्य त्यांनी नेटाने आणि सातत्याने केलं आहे.विविध देशांतील वाचकांना आपल्या विचारांनी जोडणं ही त्यांच्या लेखनशक्तीची मोठी ताकद आहे.विविध विषय, विविध दृष्टिकोन आणि वैविध्यपूर्ण शैली यांच्या साहाय्याने त्यांनी मराठी लेखनाला समृद्ध केलं आहे.
आज त्यांच्या ब्लॉगला ४५,००० च्या वर वाचकांनी भेट दिल्याचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठलेला आहे — हे केवळ आकड्यांचं नव्हे,तर विचारप्रवाहाच्या विस्ताराचं प्रतीक आहे.
विजय,तुमच्या लेखणीतून पुढेही असेच विचार उमटत राहो,समाजमनाला भिडणारे शब्द साकारणारे तुमचं हे कार्य अव्याहत सुरू राहो,हीच शुभेच्छा!
" जितकी मर्यादा तुटते शब्दांची,
तितकी दुनिया उघडते विचारांची,
५०० लेखांचा हीरा झळकतो,
तुमच्या लेखणीचीच ही मोठी सजवाट होती! "
पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन!
Dr.Deepak Shete (KOLHAPUR)
लेख असो वा वाचक ही केवळ एक संख्या आहे. ती निरंतर वाढत राहणारच.आणि साहेब वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या विचारांची माणसं एका माळेत गुंफली गेली ही अत्यंत मौलिक अशी बाब घडत आहे.सॅल्यूट
दादासाहेब ताजणे,सेलू,परभणी.
कोविड काळामध्ये आमच्या शाळेतले शिक्षक माधव गव्हाणे सर यांनी मला फोन करून सांगितले की ,'आज रात्री आपल्या शाळेतील मुलांना कोल्हापूर येथून विजय गायकवाड नावाचे व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत,तुम्ही त्यात जॉईन व्हा.मी जेव्हा त्यात जॉईन झालो.तेव्हा एक बनियन परिधान केलेली व्यक्ती आणि त्या व्यक्तीच्या पाठीमागे पत्राचे घर आणि एक लाईट दिसत होता.
मला वाटले काहीतरी तांत्रिक अडचणीमुळे हे दृश्य दिसत आहे की काय ? परंतु जेव्हा कळाले की हेच 'विजय गायकवाड 'आहेत तेव्हा माझा भ्रमनिरास झाला.कारण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारी व्यक्ती कोणी सुटा - बुटातील असेल असे मला वाटले . थोड्यावेळाने मी कार्यक्रमातून बाहेर पडलो.यानंतर मी हे सर्व विसरून गेलो .
काही महिन्यांनी गव्हाणे सरांनी मला सांगितले की , कोल्हापूरहून माझे फेसबुक फ्रेंड विजय सर येणार आहेत तेव्हा तुम्ही शाळेत या.नंतर त्यांचा छोटा कार्यक्रम झाला आणि आम्ही ऑफिसमध्ये बसलो . मी गायकवाड साहेबांना विचारले,
'तुम्ही एवढ्या लांबून तुमचे कुणी नातेवाईक नसताना ओळख नसताना आणि काही काम सुद्धा नसताना स्वतःचा पैसा आणि वेळ खर्च करून कशासाठी आलात ? ' तेव्हा त्यांचे एकच वाक्य असे होते की, 'मी तुम्हाला निरपेक्षपणे भेटायला आलो आहे.'
या एकाच वाक्याने माझी आणि 'विजय गायकवाड ' या नावाची मैत्री आणि आत्मीय संबंध तयार झाला. कुठलाही स्वार्थ नसताना कुठलेही काम नसताना केवळ फोनवर झालेल्या ओळखीमुळे एखादा माणूस एवढ्या लांबून भेटण्यासाठी येऊ शकतो ही गोष्ट एकदम वेगळी होती.तेव्हापासून आज पाच वर्षापेक्षा जास्त काळापर्यंत गायकवाड सर आणि मी फोनवर,प्रत्यक्ष भेटत आहोत.
ते जेव्हा एकदा आमच्या गावी व्याख्यानासाठी आले होते तेव्हा माझ्या घरी मुक्कामी राहिले तेव्हा त्यांच्या एकूणच कौटुंबिक आणि सर्व परिस्थितीची चर्चा झाली तेव्हा मला कळाले की सर नववीपर्यंत शिकलेले आहेत आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे.कारखान्यात कामावर आहे.
तरीसुद्धा पुस्तक वाचनाचे वेड आणि त्यातून मिळणारे ज्ञान आणि ते ज्ञान दुसऱ्यापर्यंत पोहचले पाहीजे याची तळमळ या सर्व गोष्टी बघून मला सरांबद्दल आदर आणि आदरभावच निर्माण झाला.
जेव्हा 'आदरणीय 'हा शब्द मी बऱ्याच वेळा वापरला आणि ऐकला होता परंतु आत्मीयतेतून आणि नैसर्गिक पणे अकृत्रिम पणे वापरलेला मी पाहीला नव्हता.आत्मीयतेनेच 'आदरणीय तात्या ' हा माझ्यासाठी गायकवाड सरांनी वापरलेला शब्द ऐकून मला माझ्याबद्दलच ' 'आदर' निर्माण होतो.
फोनवर प्रथम बोलताना काय चालले ? असे मी विचारताच विजय गायकवाड म्हणतात,'आत्ता सध्या मी एका महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्वाची बोलत आहे म्हणजे तुमच्याशी.तेव्हा मला माझाच 'गौरव ' झाल्यासारखे वाटते.नववी शिक्षण झालेला माणूस एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्ञानाचा सिंचन करू शकतो याचेच मला नवल वाटते.विजय गायकवाड हे पुस्तक वाचून सर्वात प्रथम मला फोनवर त्या पुस्तकांबद्दल बोलतात तेव्हा मला माझा 'अभिमान ' वाटतो कारण त्या पुस्तकाबद्दल आणि त्या पुस्तकाविषयींच्या मताबद्दल जेव्हा ते समजावून सांगतात तेव्हा माझ्या ज्ञानात अधिक भर पडते . एकूणच सरांमुळे माझ्या वाचण्यात आणि विचार करण्यात आमुलाग्र बदल झालेला आहे.
माणूस म्हणून वाचलं पाहिजे आणि माणूस म्हणून जगलं पाहिजे या सरांनी सांगितलेल्या गोष्टी सतत ध्यानात येतात.
आतापर्यंत जवळपास ५०० ब्लॉग लिहिलेले आहेत,त्याला भेट दिलेल्या वाचकांची ४४,६७२ पेक्षा जास्त आहे.१३३ भाषांमध्ये हा ब्लॉग उपलब्ध आहे,सध्या जवळपास २० देशांमध्ये तो वाचला जातो,हे खरचं,खूपच अविश्वसनीय वाटते .कारण नववी शिकलेला माणूस हे लिहूच शकत नाही हे वाटते.लिहिण्यासारखं गायकवाड सरांबद्दल खूप आहे परंतु लिहिणं शक्य नाही .
तेव्हा लवकरच गायकवाड सर तुमचे ५ हजार लेख आणि १ लाख वाचक होणार यात तिळमात्र शंका नाही.आणि मी तुमचे त्यासाठी खूप मनापासून अभिनंदन करतो .
५ हजार व्या लेखाचे अभिनंदन करताना यापेक्षा 'मोठं '
लिहीण्याचा सराव करीन .
लक्ष्मण विठ्ठलराव गाडेकर
रायपूर ता. सेलु जि .परभणी
गायकवाड सर नमस्कार मी आपला नियमित वाचत नाही परंतु जेव्हा वेळ भेटेल तेव्हा निश्चितच आपला ब्लॉग वाचत असतो खूपच सुंदर रचना केलेली असते आणि आपला ब्लॉग वाचत असताना आम्ही स्वतःला विसरतो वाचताना आम्हाला आनंद होतो असेच ब्लॉग आमच्यासाठी तयार ठेवत जा आम्हाला तेवढाच आपला वाचणाचा आनंद मिळत राहील. - सोपान मगर,सेलू,परभणी.
साहेब तुमचा ब्लॉग वाचताना असं वाटतं की लेखन हे केवळ शब्दांचे खेळ नसून,ते जीवनाच्या विविध पैलूंना भिडून जाणारी एक सजीव अनुभूती आहे. प्रत्येक लेखात अनुभवांची प्रामाणिकता,भावनांची गहिवर आणि विचारांची खोली दिसते.४९० हून अधिक लेख म्हणजे तुमची सातत्यपूर्ण मेहनत आणि वाचकांवरील प्रेम याचे उत्तम उदाहरण आहे. ५०० व्या लेखाच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.हे लेखनप्रवास असाच प्रेरणादायी ठरावा, हीच सदिच्छा..!! पार्थ गाडेकर,तंत्रज्ञ सहकारी,रायपुर
आदरणीय सर सप्रेम नमस्कार.विजय गायकवाड सरांच्या ब्लॉगचा मी नियमित वाचक आहे.त्यापासून मला नेहमीच प्रेरणा मिळत असते.सकाळी झोपेतून उठल्यानंतर जेव्हा मोबाईल हातामध्ये घेतो तेव्हा प्रथम मी आदरणीय गायकवाड साहेब यांचा ब्लॉग वाचतो.नंतरच पुढील कार्य करीत असतो.आदरणीय गायकवाड सरांचा ब्लॉग वाचल्यापासून माझ्या जीवनात अनेक असे आमुलाग्र बदल झालेले आहेत.त्यांचे लिखाण अत्यंत प्रभावी,दर्जेदार,
प्रेरणादायी असतात .त्यामध्ये सखोल वास्तव ज्ञान मिळते.ह्या ज्ञानाचा उपयोग मी माझ्या दैनंदिन जीवनात करीत असतो.असाच मला सरांच्या ब्लॉगच्या वाचनाचा नेहमी उपभोग मिळावा हीच अपेक्षा - राजेश कान्हेकर,सेलू
मा.विजय गायकवाड,
चार भिंतीतल्या शिक्षणापेक्षा,भिंतीबाहेरच्या शिक्षणावर जास्त प्रेम करणारा अवलीया : म्हणजे विजय गायकवाड.
वाचनाचे अफाट वेड त्यासाठी केलेली पदरमोड आणि हे चांगले वेड इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू केलेला विजय गायकवाड हा ब्लॉग त्याला मिळालेले जवळपास ४५००० वाचक आणि ५०० लेख... सगळेच अविश्वसनीय आणि अफाट.एका सामान्य माणसाकडून घडलेले हे असामान्य कार्य कौतुकास पात्र आहे.ब्लॉगमधील लिखाण वाचत रहावे आणि पुढील ब्लॉग लवकर वाचायला मिळावा,अशी इच्छा होणारा informativeअसतो.
आपला हा प्रयत्न सफल होवो.आम्हास ब्लॉगच्या माध्यमातून सकस वाचायला मिळो आणि आपले कार्य सुफळ संपूर्ण होवी. - खूप खूप शुभेच्छा आणि सदिच्छा!
प्रा.सर्जेराव राऊत,शैक्षणिक विभाग प्रमुख,
चाटे शिक्षण समूह,कोल्हापूर विभाग
नावातच तुमच्या विजय आहे.विजयासारखे जिवन.वि - म्हणजे विचारांचे भांडार,ज - म्हणजे जनासाठी खुले करून.य - म्हणजे यज्ञ अविरतपणे चालू ठेवनारे.विजय गायकवाड सर तुमच्या विचारांचा सहवास मिळने हे आमचं भाग्य आहे.
तात्यासाहेब बंधू रायपूर,परभणी
सत्कार्माची सोनेरी पाऊले..
श्रावणात गावोगावी ग्रंथवाचन केलं जातं.एकजण वाचतात आणि उपस्थित ते ऐकत राहतात. संत-माहात्म्यांचे विचारधन अनमोल असा ठेवा असतो.प्रथम ओवी वाचली जाते आणि तिचे मतितार्थ सविस्तरपणे सांगितला जातो.इथं हे उदाहरण द्यायचं कारणं असं की,आधुनिक जगात वावरताना एक वाचक आपण जे वाचतो,त्यातील समाजाला पोषक असलेली माहिती म्हणजेच त्याचा अर्क आपल्या ब्लॉगद्वारे वाचकांपर्यंत पोहोचवितो.त्याला प्रतिसादही प्रचंड आहे,हे ४४२५८ वाचकांची आकडेवारी सिद्ध करते.मग ही व्यक्ती नक्कीच उच्चविद्याविभूषित,साहित्यिक वगैरे असेल,असा अंदाज बांधला जाणं साहिजिकच आहे.पण हे आगळंच व्यक्तिमत्त्व आहे.
मॅट्रिक फेल विजय गायकवाड.
कोल्हापुरातील एमआयडीसीमध्ये एका कंपनीत दिवसभर धगीशी मैत्री आणि पहाटे व संध्याकाळी पुस्तकाशी सलगी करणारे असे हे अवलिया.केवळ १० हजार पगार असूनही महिन्याला १,५०० रुपयांची ते पुस्तके खरेदी करतात.आणि त्याचा वाचून फडशा पाडतात.त्यातून जे जे समाजापर्यंत पोहोचवायचे ते साररूपात तयार करून ब्लॉगवर टाकतात.
आतापर्यंत त्यांच्या दोन खोल्यांच्या घरात ७२ हजारांच्या पुस्तकांचं छोटं ग्रंथालयच थाटलं आहे.तीच पुस्तकं विजय गायकवाड आणि कुटुंबीयांचं महत्त्व वाढवितात.
विजय गायकवाड अगदी साधा माणूस;पण विचारसरणीने उंचावलेला.नम्रपणा ठासून भरलेला. वाचनाचा उपयोग प्रत्यक्ष जीवनात करणारा.सहज जरी विषय काढला तर ते आपल्याला अनेक देशांत फिरवून आणतात,
इतकं त्यांनी सातासमुद्रापलीकडच्या महनीय लेखकांना पुस्तकातून वाचलंय.त्यातून ते स्वतःला धन्य मानतात.हीच त्यांची खरी श्रीमंती.
ब्लॉगच्या रूपात ते समाजसेवेचे अत्युच्य काम करतात.
त्यांच्या या कार्याला खरोखरीच सलाम करायला पाहिजे.
ता.क.त्यांनी आतापर्यंत ४९० लेख ब्लॉगवर लिहिले आहेत.
५०० लेखांच्या समीप ते आले आहेत.ते लवकरच पूर्ण करतील.याची मला पूर्णपणे खात्री आहे.त्यांच्या या कार्याचे मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा…!
भरत बुटाले ('लोकमत'च्या कोल्हापूर आवृत्तीत वरिष्ठ उपसंपादक आहेत.)
'कामधेनुगुना विद्या ह्यकाले फलदायिनी ।
प्रवासे मातृसदृशी विद्या गुप्तं धनं स्मृतम् ॥'
या वचनाप्रमाणे ज्यांनी आपले जीवन विविधांगी वाचन आणि चौफेर सकस लेखन यांनी समृध्द केले ते आमचे सहृदयी सन्मित्र विजय गायकवाड यांना अक्षय अक्षरब्रह्म सेवेसाठी खूप खूप धन्यवाद
माणूस कसाही असू द्या शिक्षित वा अल्पशिक्षित पण तो सुसंस्कारित असायला हवा.याचं सचेतन उदाहरण म्हणजे मॅट्रीक फेल विजय गायकवाड. यांच्याकडे पाहिल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते,ती म्हणजे माणूस व्यासंगी वाचनाने समृध्द होतो तर वैचारिक लेखनाने विस्तीर्ण.....
विजय गायकवाड यांनी आपल्या विजय गायकवाड ब्लॉग वर आज अखेर ४९० विविध विषयांवर लेख लिहिलेले आहेत आणि यांची वैश्विक वाचक संख्या ४५ हजारापर्यंत आहे.
यावरूनच आपल्या लक्षात येते की समृध्द वाचनाची गोडी काय असते.
औद्योगिक क्षेत्रात काम करतानाच यांनी वाचन आणि लेखनालाच आपल वैचारिक कार्य सतत सुरू ठेवलेले आहे.विविधांगी वाचन असल्याने लेखन कार्यात सहज आढळणारा अक्षरब्रह्माचा प्रवाह वाचकास विचारप्रवृत करतो.
जगप्रसिध्द बास्केटबॉल प्रशिक्षक जॉन वूडण यांच्या वचनाप्रमाणे...
'यश म्हणजे मनाची शांतता होय.आपल्याला जे काही करणे शक्य आहे, ते सगळे अगदी चांगल्याप्रकारे करण्याचे जास्तीत जास्त चांगले प्रयत्न आपण केले की,आपल्या मनाला शांती लाभते !'
असाच सरस्वतीचा दिव्य आशीर्वाद.आपणास सदैव लाभावा...आपला उत्कर्ष व्हावा ही सदिच्छा !
भावी कार्यास शुभेच्छा.
राजेश पिष्टे - देशमुख,पर्यवेक्षक,गोविंदराव हायस्कूल,इचलकरंजी
५०० लेखांचा टप्पा – विजय गायकवाड यांना मनःपूर्वक शुभेच्छा !
ज्यांच्या लेखणीतून शब्द नव्हे तर अनुभव वाहतात, विचार उमटतात आणि अंतर्मनाला हलवून टाकणारी जाणीव जागी होते — असे माझे मित्र विजय गायकवाड आज त्यांच्या ब्लॉगच्या ५०० व्या लेखाच्या टप्प्यावर पोहोचले आहेत.
' मॅट्रिक फेल ' ही उपाधी त्यांनी हास्याने स्वीकारली,पण त्यांच्या जिद्दीने आणि कलेने ते जीवनाच्या परीक्षेत मात्र मोठ्या यशाने उत्तीर्ण झाले आहेत.
जगभरातील वाचकांपर्यंत त्यांनी आपल्या मराठी भाषेचा गंध पोहोचवला आहे.सामाजिक, संवेदनशील,भावनिक,
वैयक्तिक,तात्विक अशा विविध विषयांवर लिहीताना त्यांनी केवळ लेख लिहिले नाहीत,तर लोकांच्या मनात विचारांची बीजं पेरली.
५०० लेख आणि सुमारे ५०,००० वाचक हे त्यांच्या मेहनतीचं,
सातत्याचं आणि लेखनातल्या निखळ प्रेमाचं फलित आहे.
परिस्थिती कठीण असली तरी वाचनाचा आणि विचारांचा जप त्यांनी अखंड केला — यासाठी त्यांना मानाचा मुजरा आणि मनापासून शुभेच्छा!
तुझी लेखणी अशीच चालू राहो,विजय ! पुढील टप्प्यांसाठी प्रेम,शुभेच्छा आणि स्फूर्ती अशीच मिळत राहो ! .
डॉ.दिपक शेटे,महाराष्ट्र शासन राज्य गौरव पुरस्कार प्राप्त,गणितायन लॅब निर्माते
' शब्दांचा दीप '
वाट कठीण,संकटं भारी,
तरी न थांबला हा ध्यास तुम्हांला,
शब्दांच्या या उजळ वेलीने
साजरं केलं लेखणीचं पावन
जणू व्रत तुम्हांला.
पानोपानी प्रांजळ लेख,
मनाच्या गाभाऱ्यात पोचले,
कधी तत्त्वज्ञान,कधी भावभावना,
वाचकांच्या मनी खोल रुजले.
' मॅट्रिक फेल ' ही ओळख जरी,
तरी प्रतिभेचा परीघ विस्तृत,
५०० लेखांचा सोहळा आज,
आपल्या कर्तृत्वाला होईल वंदन अष्टदिशांत.
पन्नास हजार वाचकांचे
मन जिंकलं आपण लेखणीने,
मराठीला दिला मान,
अनुभवांच्या सुंदर शिदोरीने.
सलाम तुमच्या त्या लेखनप्रेमाला,
शब्दांतील तुमच्या त्या झऱ्याला,
पुढे चालत राहो ही वाट तुमची,
प्रेरणा मिळो नव्या वाटसरूंना !
डॉ.दिपक शेटे,महाराष्ट्र शासन राज्य गौरव पुरस्कार,
गणितायन लॅब निर्माते..!
शब्दांच्या पलीकडे आहे
तुमची लेखन माला.
वाचनाने तुमचा प्रवास
साता समुद्रापार नेला
गुगलने ही घेतली आहे
तुमची आता दखल.
जरी मॅट्रिक फेल म्हणून
शिक्षणाने दिली असेल बगल.
माणसाच्या मनात जिद्द असेल
तर कुठूनही सुरुवात करू शकतो
वाचनाची भूक भागवण्यासाठी
भाकरीसह पुस्तके विकत घेतो.
तुमच्याविषयी लिहिताना
आमचे शब्द अपुरे पडतात
डिग्री संपादन केलेले देखील
मॅट्रिक फेल वाल्यांच्या प्रेमात पडतात.
अनिल फारणे.
शिगांव.
मला सापडलेला परिस - विजय गायकवाड
माणसं पदव्या घेतल्याने मोठे होतात असं नाही.तर पदवी नसताना सुद्धा ज्ञानाच्या बळावर माणसं मोठे होतात.
ज्ञान हे चंदनाप्रमाणे जीवनात सुगंध पसरवत असते.
पुस्तके हे ज्ञानाचा सागर आहेत.पुस्तकाच्या सानिध्यात माणूस आला की,त्याचा परिस होतो. असाच एक परीस कोल्हापूर येथील विजय गायकवाड यांच्या रूपाने मला सापडला.
माझे स्नेही माधव गव्हाणे यांच्यामुळे विजय गायकवाड यांची ओळख झाली.नववी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर,
कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी एका कंपनीत मजूर म्हणून काम करणारे विजय गायकवाड.शिक्षण व विजय गायकवाड यांची जणूकाही फारकतच झाली होती. कौटुंबिक व संसारिक जीवनात अडकलेला हा सर्वसामान्य माणूस.
दररोज सकाळी उठून आडाचे पाणी भरणे व आपला डब्बा घेऊन कंपनीत कामाला जाणे.हा त्यांच्या नित्यनियमाचा प्रवास होता. परंतु शारीरिक श्रमाचा विसर पडण्यासाठी विरंगुळा म्हणून हा माणूस पुस्तकांकडे वळला. पुस्तकांशी एवढी घट्ट मैत्री झाली.ती मैत्री माणसांच्या नात्याच्या पलीकडची झाली.पुस्तकांनी त्यांच्या जीवनात आनंद,चैतन्य आणले.महिन्याला नऊ हजार रुपये कमावणारा माणूस आपल्या पुस्तकरूपी मित्रांना जवळ करण्यासाठी २५०० रुपये पुस्तक खरेदीवर करू लागला.
व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेले माणसं जीवन संपवतात. परंतु पुस्तक वाचनाच व्यसन जडलेला हा माणूस जीवनाच्या उच्च शिखराकडे पोहोचला.
त्यांनी वाचलेली ग्रंथ ,ग्रंथातील विचार,तत्त्वज्ञान हा त्यांच्या जीवन जगण्याचा भाग बनला.
आमच्यासारख्या पाचशे किलोमीटर दूरच्या मित्रांना सुद्धा त्यांच्या या पुस्तक वेडेपणाची ओढ लागली. परभणीतल्या अनेक मित्रांशी त्यांचे नाते जडले. ते फक्त त्यांच्या पुस्तक वेडेपणामुळे.
मला तर नेहमीच त्यांच्या बोलण्याची ,त्यांच्या शब्दाची ओढ कायम राहिली.आजही ते बोलताना एखादा शब्द,वाक्य हे जीवन जगण्याचा मंत्र देऊन जातात.नियमित वाचनाची सवय,वाचनाची तहान त्यांची काही भागत नाही.म्हणून त्यांनी स्वतःचेच ग्रंथालय निर्माण केले.हजारो पुस्तक वाचन झाल्यानंतर त्यांचे विचार आमच्यासारख्या मित्रांपर्यंत पोहोचविले.
वाचनाबरोबर लिखाणाला प्रारंभ झाला. स्वतःच्या नावाने ब्लॉग तयार करून त्यावर त्यांचे 500 लेख प्रसिद्ध झाले.
4500 वाचकांपर्यंत जगातल्या 27 भाषांमध्ये हे लेख पोहोचले.अनेक वृत्तपत्रातून,मसिकातून लेखन,अनेक शाळा, महाविद्यालयग्रंथालय येथे व्याख्यान देऊन लोकांना वाचनाचे महत्त्व सांगून जगण्याचा खरा मार्ग शिकवणारा हा परिसच आहे.
आज विजय गायकवाड हे एक पुस्तकाचे झाड म्हणून ओळखले जातात.वाचन संस्कृती हरवत चाललेल्या समाजात विजय गायकवाड हे आदर्श म्हणून उभा आहेत.मी लाडाने त्यांना दादा म्हणतो. परंतु वाचनामधला खरंच दादा माणूस म्हणून आज नावारूपात येत आहे.भविष्यात विजय गायकवाड हे एक स्वतंत्र ग्रंथालय असेल.ज्ञानाचे ज्ञानपीठ असेल.व विद्येचे विद्यापीठ असेल.
एका मजुरी पासून सुरु झालेला प्रवास हा पुस्तकाचे झाड म्हणून उभा राहिला आहे.माणसं पैसे किती कमवू शकतात.
पैशाने ज्ञान कमावता येत नाही.त्यासाठी पुस्तकांशीच मैत्री लागते.पुस्तकांशी मैत्री करता करता स्वतःच एक पुस्तक झालेला भला माणूस अगदी जवळून पाहत आहे.आपलं
पुस्तक वाचण्याचा वेड आम्हा सर्वांना लागो व आपले लिखाण समाजाला दिशा देणारे ठरो हीच मनःपूर्वक शुभेच्छा.......! - आपला
सुभाष बाबाराव ढगे ,परभणी -
" पुस्तके सोबत असणं म्हणजे अज्ञात आयुष्य ज्ञात करून परिपूर्णतेने प्रवास करण्यासारखं आहे. पुस्तकातील दोन ओळींमधील मोकळ्या जागेतील मी प्रवासी आहे.आणि या पुस्तकासोबत घेऊन केलेला प्रवास माझ्यासाठी अविस्मरणीय व अलौकिक असा आहे..." असे विजय कृष्णात गायकवाड यांनी ब्लॉग च्या सुरुवातीसच विषद केले आहे.विजय गायकवाड यांच्या या कार्यास शुभेच्छा!
विजय गायकवाड,याचा ब्लॉग अतिशय सुंदर, इन्फॉर्मेटीव,विविध विषयावर सखोल विचार,मनाच्या भावनांना वेगळी चांगली वाट दाखवणारा,गरीब श्रीमंत, स्री पुरुष,मूल व आई सर्वांनाच आवडणारा,मनाला भावणारे विविध विषयावर चर्चात्मक विचार देणारा आहे.विजय गायकवाड यांनी हे सर्व विचार या ब्लॉग द्वारे मांडले आहेत.
विजय गायकवाड याचे हे कार्य आकाशाला भिडणारे प्रचंड आहे.सध्या च्या या काळात समाजामध्ये विविध कारणाने असंख्य प्रश्न निर्माण होत आहेत,या संघर्षमय जीवनात विजय गायकवाड यांनी विविध रंग उलगडून जगण्याची नवी उर्मी निर्माण करून हा ब्लॉग सप्तरंगी मोराच्या पिसासारखा सुंदर सादर केला आहे.विजय गायकवाड यांच्या या कार्यास शुभेच्छा! त्याचे हे कार्य अखंडित चालू रहावे!
डॉ.सुनिल सरवदे
पीएचडी IIT Bombay,
निवृत्त प्रिन्सिपल वाडिया
अभियांत्रिकी कॉलेज,पुणे
सोलापूर/ पुणे
वाचनप्रेमींचा विजय
पुस्तक हे मानवी संस्कृतीचे मस्तक आहे. पुस्तके माणसाला घडवतात. पुस्तकातील समृद्ध विचाराने माणूस समृद्ध होतो. माणसाची ही आवड लक्षात घेऊन विजय गायकवाड यांनी ब्लॉग रूपाने सुरू केलेला पुस्तक परिचय खऱ्या अर्थाने संस्कृती संवर्धक आणि मानवी मनाला उत्तेजक आहे. पुस्तकात एक अद्भुत जग पाहायला मिळते, दुनियेची सफर घडवून आणण्याचं काम पुस्तक परिचयाच्या रूपाने विजय गायकवाड करत आहेत.
वाचनासाठी शिक्षणाचा मापदंड नसतो; म्हणूनच दहावी नापास असून सुद्धा पुस्तकांची आवड विजयरावांनी मनापासून जपली.जे जे आपणासी ठावे । ते ते इतरांशी सांगावे।शहाणे करून सोडावे । सकल जन।। या उक्तीप्रमाणे आपल्या ज्ञानामृताचे कण सर्वांना मुक्त हस्ते ब्लॉग रूपाने वाटण्याचे काम विजयराव करत आहेत. ब्लॉगच्या रूपाने फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर; भारताबाहेर, परदेशातही ते लोकप्रिय ठरले आहेत. दहावी नापास विजयरावांचा पुस्तकांच्या बरोबरीचा हा जगप्रवास थक्क करणारा आहे.
वाचनीय पुस्तकांची ओढ लागावी म्हणून ब्लॉग रुपाने पुस्तक परिचय हे विजयरावांचे काम आहे. कोल्हापूरच्या एमआयडीसीत काम करणारा हा माणूस दर महिन्याला हौस म्हणून दोन हजारांची पुस्तके खरेदी करतो. इतर व्यसनांमध्ये आणि मौज म्हणून आपण पैशांची उधळण करतो पण; विजयरावांची ही पैशांची उधळण ज्ञानासाठी आहे. दहावी नापास विजयरावांनी घेतलेले हे व्रत माणसाला, वाचकाला सजग करणारे आहे. ते लिहितातही इतकं छान की; शेवटपर्यंत वाचत राहावं असं वाटतं. शिवाय उद्याच्या भागात काय वाचायला मिळेल, याची उत्कंठा लागून राहते.
पाश्चिमात्य लेखकांचे लेख, कादंबरीचा सारांश, कथानकाचा आशय, पात्रांची स्वभाव वैशिष्ट्ये आणि जगाची अद्भुत सफर या सगळ्या गुणवैशिष्ट्यांनी विजयरावांचा ब्लॉग आज सर्व परिचित झाला आहे. शिवाय नवोदित लेखक आणि अनुभवी लेखकांची लेखन शैली , त्यांचे विचार सर्वदूर पसरवण्याचे श्रेय विजयरावांनाच द्यावे लागेल. पुस्तकातली ही किमया तंत्रज्ञानाच्या मदतीने पूर्ण करणे हे अवघड शिवधनुष्य विजयरावांनी मात्र लीलया पेलले आहे. वाचनाची आवड लोकांमध्ये निर्माण करण्याचा त्यांचा हा प्रांजळ प्रयत्न कौतुकास्पदच नव्हे तर ;अंगीकारण्यास योग्य आहे. त्यांच्याकडून अद्भुत दुनियेची पुस्तक सफर आम्हा वाचकांना एक प्रकारची मेजवानी आहे. बुद्धीला मिळणारे हे खाद्य त्यांच्याकडून सदोदित वाचक लोकांना मिळत राहो हीच त्यांना मनापासून शुभेच्छा....
व्ही जी…
आदरणीय विजय गायकवाड सर तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात त्यामुळे तुमच्याविषयी काय प्रतिक्रिया लिहावी सुचत नाही किंवा एवढ्या मोठ्या माणसाविषयी प्रतिक्रिया देण्याइतपत माझी बुद्धी आहे का हा विचार माझ्या डोक्यात आहे.सर तुमच्याकडून बऱ्याच गोष्टी मी माझ्या जीवनात उतरण्याचा प्रयत्न करीत आहे.सर्वात महत्त्वाचं म्हणजे निस्वार्थ प्रेम दुसऱ्यावर कसं करायचं ते मी तुमच्याकडून शिकलो तुम्ही नेहमी फोन करत असतात.तुम्ही कसे आहात मजेत आहात का आणि मजेतच राहा हे वाक्य माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे यातून तुमचे निस्वार्थ प्रेम मला कळतंय.
समाज कार्य करताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःमध्ये संयम आणि सहनशीलता महत्त्वाची असते आणि हे सुद्धा मी तुमच्याकडून शिकलो कारण समाज कार्य करत असताना खूप वेगवेगळ्या लोकांशी संपर्क येतो त्यातून राग द्वेष येतो परंतु चांगलं काम करत असताना संयम महत्त्वाचा आहे.तुम्ही मला फोनवर बोलत असताना नेहमी सांगत असतात की संयम आणि संहशीलता हे समाज कार्य करण्यासाठी खूप महत्त्वाच आहे. आणि माझं समाजकार्य निरंतर सुरू आहे.
पैशाला जीवनात किती महत्त्व द्यायचं हे पण तुमच्याकडे बघून माझ्या जीवनात उतरण्याचा प्रयत्न करीत आहे कारण तुम्ही छोटीशी नोकरी करून स्वतःच परिवारासह आनंदात जीवन जगतात. गाडी बंगला याचा कधीही विचार न करता फक्त पुस्तकं च माझं सर्वस्व आहे.संसार चालून उरलेल्या पैशात दर महिन्याला हजार दिड हजार रुपयांचे पुस्तक विकत घेतात आणि ते पुस्तक वाचून स्वतःच नाही तर आमच्या सारख्यांच्या जीवनात आनंद निर्माण करतात पुस्तक वाचण्याचा जो ध्यास आहे तो खरच अप्रतिम आहे.
तुझ्यावर कोणाचा प्रभाव असता कामा नये.तुझ्यावर केवळ तुझाच प्रभाव हे जगण्याचे तत्वज्ञान केवळ तुम्हीच देऊ शकता. स्वतःला कमी लेखू नका.असं सांगणारे विजय गायकवाड सर नेहमी स्मरणात आहेत आणि राहतील.सर तुम्ही तुम्ही आज ज्या उंचीवर पोहोचला आहात त्या मागे अर्थातच आमच्या ताईंचा खूप मोठा त्याग आहे त्यांची साथ तुम्हाला सतत लाभते आहे म्हणून आज तुम्ही या उंचीवर पोहोचलात त्यासाठी ताईंना माझा नमस्कार.
सर तुमचे लवकरच एक हजार ब्लॉग पूर्ण आणि एक लाख वाचक संख्या आहे पूर्ण हो अशी माझी ईश्वरचरणी प्रार्थना आणि आपण आमच्यासाठी असेच ब्लॉग लिहीत राहा अशी आपल्याला सदिच्छा यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा
तात्यासाहेब गाडेकर,रायपूर,परभणी
विजयराव गायकवाड सर्वांनी तुमच्याबद्दल अतिशय योग्य असेच लिहिले आहे.तुमचं पुस्तकप्रेम आम्हाला सुद्धा सतत प्रेरणा देत राहते.तुमचा ब्लॉग वाचून दिवसभर आम्ही फ्रेश राहतो.सकाळी उठल्याबरोबर आपला ब्लॉग आधी वाचतो.
पुस्तक प्रेमी माणसं आज दुर्मिळ होत असतांनाच गायकवाड सर दिव्याच्या ज्योतीने इतरांना प्रकाश देण्याचे काम करतात.
प्राचार्य भास्कर गायकवाड,वासिम
अस मी बऱ्याच वडीलधाऱ्या व्यक्तींकडून ऐकले आहे की,कधीही दुसऱ्याचे वाईट व्हावं असा विचार न करता दुसऱ्याचे चांगले व्हावे असाच विचार केला की आपले आपोआप चांगले होते.आणि तुमच्या बोलण्यातून सतत दुसऱ्याप्रती आपुलकी,प्रेम,आस्था आणि आदर भाव ऐकायला मिळतो.त्यामुळेच लोकांच्या ही मनात आपल्याप्रती असलेले प्रेम,आशीर्वाद रुपी त्यांच्या वाणीतून ओसंडून वाहत आहे,सर आपण खरच ग्रेट आहात.
रमाकांत लिंबाजीराव गव्हाणे,चाटोरी
खूप छान,आणि विशेषतः एका शेतकरी वाचकाची ही प्रतिक्रिया एखाद्या पुरस्कारापेक्षाही खूप मोलाची आहे..
खरंच तुम्ही आमच्यासारख्या अनेकांना प्रेरणादायी आहात.
बंधूतुल्य रामराव गायकवाड,सेलू
तुम्ही अनेक भरकटलेल्या व्यक्तींचे तसेच माणसिक संतुलन बिघडलेल्या लोकांचे प्रामाणिक मार्गदर्शक आहात.
- अरुण दबडे
२०.०५.२५ या लेखातील पुढील शेवटचा भाग
हे कधीच सांगू नका,never say that
दुसऱ्या व्यक्तीच्या विचारांच्या प्रति सन्मान दाखवा. हे कधीच सांगू नका,' तुम्ही चूक आहात.'
ग्रीले सिविल वॉरच्या वेळी अमेरिकेचे सर्वाधिक प्रसिद्ध संपादक होते.ते लिंकनच्या नीतीबद्दल अत्यंत असहमत होते.त्यांचा विश्वास होता की ते वाद,उपहास आणि अपमानाचे अभियान चालवून लिंकनला आपल्या पक्षात सामील करतील.त्यांचे कटू अभियान महिनों महिने ,वर्षानुवर्ष चालले.खरं तर त्यांनी त्या रात्री लिंकनवर एक क्रूर,कटू,
आलोचनात्मक आणि व्यक्तिगत आघात करणारे संपादकीय लिहिले होते,ज्या रात्री बूथने लिंकनवर गोळी चालवली.
पण इतक्या कटूतेवरही लिंकन ग्रीलेबरोबर सहमत झाले का? कधीही नाही.उपहास आणि अपमानानं कधी सहमत नाही होऊ शकत.
जर तुम्हाला लोकांबरोबर आपले संबंध सुधारण्याच्या बाबतीत उत्तम उपाय हवा असेल,जर तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्त्वाला खुलवावंसं वाटेल,तर तुम्ही बेंजामिन फ्रैंकलिनची आत्मकथा नक्की वाचा.हे अमेरिकेच्या साहित्यातले एक अमर पुस्तक आहे आणि हे सगळ्यात आकर्षक आत्मचरित्रातलं एक आहे.बेंजामिन फ्रैंकलिन सांगतो की,त्यांनी आपला वाद करण्याच्या मूडवर कसा ताबा ठेवला आणि कोणत्या प्रकारे त्यांनी आपल्या स्वतःला अमेरिकन इतिहासाचे सर्वाधिक योग्य,सौम्य आणि कूटनीतिज्ञ मनुष्यांमधला एक बनवला.
आपल्या तारुण्यात बेन इतका वाद घालत की,एक जुना मित्र त्यांना बाजूला घेऊन गेला आणि त्यांच्यावर खऱ्याचे आसूड मारायला सुरुवात केली.मित्राने त्यांना म्हटले,"बेन,तुझे काहीच होऊ शकत नाही.तुझे विचार तुझ्याशी असहमत असणाऱ्या लोकांना हातोड्यासारखे वार करतात.तुझे विचार इतके आक्रमक असतात की, कोणी त्याची पर्वा करत नाही.मित्र मानतात की,जेव्हा तू नसतोस तेव्हा त्यांचा वेळ खूपच आनंदात जातो. तुम्हाला इतकं ज्ञान आहे की,दुसरी व्यक्ती तुम्हाला काहीच सांगू शकत नाही आणि कोणी तुम्हाला सांगायचा प्रयत्न का बरं करेल,जेव्हा ते करताना त्याला खूप कष्ट,खूप मेहनत करावी लागेल,त्यामुळे तु जीवनात काहीच शिकू शकणार नाहीस आणि तुझ्यापाशी जे थोड बहुत ज्ञान आहे.तेच तुझ्यापाशी नेहमी राहील."
बेजामिन फ्रैंकलिनाची तारीफ करायला पाहिजे की,त्यांनी या अपमानकारक आलोचनेला खूप चांगल्या प्रकारे घेतलं. ते इतके महान व बुद्धिमान होते की,त्यांनी या गोष्टीमध्ये लपलेल्या खऱ्याला ओळखलं आणि त्यांना अंदाज आला की,जर त्यांनी स्वतःच स्वतःला नाही बदललं,तर ते असफलता आणि सामाजिक विनाशाकडे जातील. त्यांना आपल्या चुकांची जाणीव झाली आणि त्यांनी आपल्यामधून आलोचना व वाद घालणे काढून टाकण्याचा निश्चय केला.
फ्रैंकलिन म्हणतात,"मी हा नियम बनवून टाकला की, दुसऱ्यांच्या भावनांचा सरळ विरोध करणार नाही आणि आपली गोष्ट आक्रमक किंवा दृढपणे करण्यास लगाम घालेन.मी हा निश्चय केला की,मी आपल्या भाषेमधून वैचारिक हट्टीपणा दाखवणारे सगळे शब्द दूर करेन. याच्या जागी मी या प्रकाराने वाक्यं बोलण्याचा निश्चय केला : मला असं वाटतं किंवा मी समजू शकतो की,ही गोष्ट अशा स्वरूपाची आहे किंवा मला या वेळी असं वाटतं आहे किंवा पहिल्या प्रथम,हे असं दिसत आहे. जेव्हा कोणी व्यक्ती अशी गोष्ट सांगते जी चुकीची आहे हे मी जाणतो,तेव्हाही मी त्याचा तत्काळ विरोध करण्याच्या आनंदाचा त्याग करीत होतो.जर मला चूक सांगायची होती,तर मी कूटनीतीच्या पद्धतीचा वापर करत होतो.मी सांगायचो की,अनेक प्रकरणांमध्ये या परिस्थितीत समोरच्याची गोष्ट खरी असू शकते;पण मला वाटतं की,या प्रकरणात ते बरोबर होणार नाही.मला शैली बदलण्याचा फायदा झाला.आता माझी चर्चा चांगली सुखद व्हायला लागली.कारण मी विनम्र पद्धतीने आपले विचार मांडत होतो,यामुळे लोक माझ्या विचारांशी आनंदाने सहमत होऊ लागले.जरी मी चुकीचा असलो,तरीही मला आता कमी अपमान सहन करावे लागत होते.जेव्हा मी बरोबर असायचो तेव्हा माझे विरोधकही आपली चूक मानून माझी गोष्ट ऐकायचे.
"सुरुवातीला या तंत्राचा प्रयोग करताना मला माझ्या स्वाभाविक इच्छेला दाबावं लागलं;पण नंतर हे तंत्र इतकं सहज झालं आणि मला याची इतकी सवय झाली की,बहुतेक मागच्या पन्नास वर्षांत कोणत्याही माणसाने माझ्या तोंडून कुठलंही निग्रही स्वरूपाचं वाक्य नाही ऐकलं.या सवयीमुळे मला वाटतं की,मी माझ्या बरोबरच्यांमध्ये इतका लोकप्रिय झालो की,जेव्हापण मी एखाद्या नव्या संस्थेचा प्रस्ताव ठेवतो किंवा जुन्या संस्थेमध्ये काही बदलण्याचा प्रस्ताव ठेवतो,तेव्हा लोक माझी गोष्ट ऐकतात.मला राजकारणामध्ये इतकं यश याचमुळे मिळालं.खरंतर मी एक खराब वक्ता होतो, माझ्यात बोलण्याची कला नव्हती,माझ्या शब्दांच्या जागा ठीक नसायच्या,माझी भाषा तर अजिबात चांगली नव्हती;पण या सगळ्यांशिवाय मी नेहमीच माझी गोष्ट मानायला लावत होतो."
काय बेज फ्रँकलिनची पद्धत व्यवसायात कामाला येईल ? आपण आता दोन उदाहरणे पाहू या.
नॉर्थ करोलिनाच्या किंग्ज माउंटनमध्ये राहणारी कॅथरीन ए.अल्फ्रेड एक यार्न-प्रोसेसिंग फ्लांटमध्ये इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग सुपरवायझर आहे.त्यांनी आमच्या वर्गाला सांगितलं की,कोणत्या प्रकारे त्यांनी आमचं ट्रेनिंग घ्यायच्या आधी आणि नंतर एका संवेदनशील समस्येचा सामना केला."माझी एक जबाबदारी ही आहे की,मी आमच्या ऑपरेटर्सकरिता प्रोत्साहन देऊन श्रेणीला टिकवून ठेवलं पाहिजे,त्यामुळे आम्ही अधिक यार्नचं उत्पादन करून जास्त धन कमवू शकू.आमच्याद्वारे कामात येणारी सिस्टिम तेव्हापर्यंत तर ठीक चालली होती,जेव्हा आमच्या जवळ केवळ दोन किंवा तीन प्रकारचे यार्न होते;पण आत्ताच आम्ही आपली रेंज वाढवली,ज्या कारणामुळे आम्हाला बारा वेगवेगळ्या प्रकारच्या यार्ननी काम करावं लागायचं.ज्या प्रकारचं काम होत होतं,
त्याप्रमाणे आम्ही आपल्या ऑपरेटर्सना तितकी चांगली रोजंदारी देऊ शकत नव्हतो आणि त्यांना जास्त उत्पादन करण्याकरता प्रोत्साहित करू शकत नव्हतो.मी एक नवीन सिस्टिम सुरू करण्याची योजना बनवली,ज्यामुळे आम्ही ऑपरेटरला यार्नच्या त्या श्रेणीच्या हिशोबाने रोजंदारी देऊ शकू ज्यावर ते आत्ता काम करत आहेत.नवीन योजना घेऊन मी मीटिंगला गेले.मी मॅनेजमेंटला हे सिद्ध करू इच्छित होते की,माझी योजना ही वर्तमानकाळात अगदी योग्य आहे. मी त्यांना विस्ताराने सांगितले की,ते कसे चूक होते आणि हेही सांगितले की,ते कुठे पक्षपात करीत होते आणि कोणत्या प्रकारे माझी योजना त्यांच्या चुका आणि भेदभाव दूर करू शकतील;पण मी वाईट त-हेने अयशस्वी झाले.नवीन योजनेच्या आपल्या स्थितीच्या बचावावर मी इतकी जास्त व्यस्त झाले होते की,मी त्यांच्याकरता जुन्या योजनांशी जुळलेल्या समस्यांना स्वीकार करायची कुठलीच जागा सोडली नाही." या कोर्समध्ये दीर्घकाळ घालवल्यावर मला जाणवलं की, माझी कुठे चूक झाली होती.मी आणखीन एक मीटिंग बोलवली आणि या वेळी मी त्यांना विचारले की,त्यांच्या समस्या नक्की काय आहेत?आम्ही प्रत्येक बाजूने विचार-विमर्श केला आणि मी त्यांचे मत विचारले की, याला सोडवायचा सर्वश्रेष्ठ उपाय काय होऊ शकतो. योग्य वेळेला विनम्रतेने मी मध्ये मध्ये त्यांना चांगले उपाय सुचविले;परंतु मी त्यांना सिस्टिमला स्वतःच विकसित करू दिलं.मीटिंगच्या शेवटी जेव्हा मी आपली योजना मांडली तेव्हा त्यांनी त्याचा उत्साहाने स्वीकार केला.मला आता पूर्ण विश्वास वाटतो आहे की,जर तुम्ही कोणत्याही व्यक्तीला सरळपणे हे सांगून देता की,तो चुकीचा आहे तर यात काही फायदा नाही होत.झालंच तर खूप नुकसानच होऊ शकतं.या प्रकारे तुम्ही फक्त या व्यक्तीचा स्वाभिमान दुखावता आणि स्वतःच स्वतःला वाईट बनवून घेता.
आता आणखीन एक उदाहरण सांगतो.लक्षात ठेवा मी जे प्रकरण सांगतो आहे,ते हजारो लोकांचे अनुभव होऊ शकतात.आर. वी. क्राउले न्यू यॉर्कच्या एका लेबर कंपनीत सेल्समन होता.क्राउलेने मानलं की,ते अनेक वर्षांपासून कठीणहृदयी लेबर इन्स्पेक्टरांना हे सांगत होते की ते चूक होते आणि ते अनेक वादांमध्ये जिंकलेपण होते;परंतु यामुळे त्यांचा काही फायदा होत नव्हता.क्राउलेने सांगितलं,"लेबर इन्स्पेक्टर बेसबॉलच्या अंपायरसारखे असतात.
एकदा ते निर्णय ऐकवतात आणि मग ते त्याला बदलत नाहीत." मिस्टर क्राउलेनी बघितलं की,वाद जिंकल्यामुळे त्यांच्या फर्मचं हजारो डॉलर्सचं नुकसान होत होतं.याकरता माझ्या कोर्समध्ये भाग घेण्याच्या काळात त्यांनी आपलं तंत्र बदललं आणि वाद घालणं सोडून दिलं.याचा परिणाम काय झाला? इथे त्यांची गोष्ट सांगतो जी त्यांनी क्लासमध्ये सांगितली.
"एका सकाळी मला एक फोन आला.फोन वरच्या रागीट व एका चिंतीत माणसाने मला हे सांगितलं की, आम्ही त्याच्या प्लॉटमध्ये जो लंबर सप्लाय केला होता, तो एकदम निकृष्ट प्रतीचा होता.
त्याच्या फर्मने माल उतरवायला मना केले होते आणि आता त्यांना आमच्याकडून त्या स्टॉकला त्यांच्या यार्डातून उठवायचा बंदोबस्त हवा होता.एक चतुर्थांश ट्रक रिकामा झाल्यानंतर इन्स्पेक्टरने आपला रिपोर्ट दिला की,लंबरचा स्तर अपेक्षित क्वालिटीच्या ५५ टक्के होता. या परिस्थितीत त्यांच्या जवळ पूर्ण माल परत करण्याव्यतिरिक्त दुसरा रस्ता नव्हता.
"हे ऐकल्यावर मी तत्काळ त्या फर्मच्या गोदामाच्या दिशेने रवाना झालो.रस्त्यात मी या समस्येतून निघण्याची रणनीती ठरवली.एरवी मी या परिस्थितीत वाद घातला असता,नियम सांगितले असते,
लंबर इन्स्पेक्टरच्या रूपात आपल्या ज्ञान आणि अनुभवाचा पाढा वाचला असता.हे सांगितले असते की,लंबरची क्वालिटी चांगल्या ग्रेडची आहे.पण मी कोर्समध्ये शिकलेल्या पद्धतीला आजमावायचा निर्णय घेतला.
"जेव्हा मी प्लॉटमध्ये पोहोचलो तर मी बघितलं की, लंबर इन्स्पेक्टर आणि प्लॉट मॅनेजर वाद घालण्याच्या आणि भांडणाच्या मूडमध्ये होते.आम्ही ट्रकपाशी पोहोचलो,ज्यातून सामान उतरवलं गेलं होतं.मी आग्रह केला की,त्यांनी माल उतरवणं चालूच ठेवावं म्हणजे मी पाहू शकेन की,मालाची क्वालिटी कशी आहे.मी इन्स्पेक्टरला म्हटलं की,तो निकृष्ट सामानाला वेगळं काढून ठेवत जाईल आणि चांगल्या मालाला वेगळं काढून दुसऱ्या ठिकाणी ठेवत जाईल,जसं तो माझ्या येण्याच्या आधी करत होता.
"काही वेळ त्याला तसं करताना बघून मी समजलो की, त्याचं पारखणं खूपच कठीण होतं आणि तो नियमांचा चुकीचा उपयोग करतो आहे.हा लंबर पांढऱ्या पाइनचा होता आणि मला माहीत होतं की,त्या इन्स्पेक्टरला हार्डवुडचं ज्ञान आहे अन् पांढऱ्या पाइनच्या बाबतीत कोणतीच खास समज नाही आहे.मी पांढऱ्या पाइनचा विशेषज्ञ होतो;पण मी त्याच्या *ज्ञानावर कुठलंही बोट ठेवलं का,तर अजिबात नाही.मी बघत राहिलो आणि हळूहळू त्याला विचारत गेलो की,अमुक अमुक तुकड्यात काय गडबड आहे.मी एकदापण हे नाही सांगितलं की,इन्स्पेक्टर चुकीचा आहे.मी परत परत या गोष्टीवर जोर देत राहिलो की,माझे प्रश्न विचारण्याचं एकमात्र कारण हे होतं की,मी भविष्यात त्यांच्या फर्ममध्ये तोच माल पाठवीन ज्यामुळे ते संतुष्ट होऊ शकतील.
जेव्हा मी या गोष्टीवर सतत जोर दिला की, ज्या तुकड्यांमुळे ते संतुष्ट नाही आहेत,त्यांना वेगळं ठेवणं उचित आहे,तेव्हा माझ्या मैत्रीपूर्ण बोलण्यामुळे आणि सहयोगी ढंगामध्ये विचारलेल्या प्रश्नांमुळे आमच्यामधली शत्रुत्वाची भिंत विरघळली.मी त्यांना सावध होऊन हेदेखील सुचवलं की,बहुतेक त्यांना जास्त महाग माल हवा आहे कारण त्यांना यापेक्षा चांगल्या क्वालिटीची आवश्यकता होती.यामुळे त्यांच्या डोक्यात हा विचार आला की,त्यांनी ज्या ग्रेडचा माल मागवला होता,अनेक रिजेक्ट केलेले तुकडे खरंतर त्या ग्रेडच्या मालाला ठीक बसत होते.फर्मच्या मॅनेजरने मानलं की, त्यांना खरंच चांगल्या क्वालिटीची आणि महाग मालाची गरज होती.मी खूपच सावध होतो की,कुठे तो हे न विचार करू लागेल की मी या विषयाचा मुद्दा बनवतो आहे.हळूहळू त्याचा पूर्ण दृष्टिकोन बदलून गेला.लंबर इन्स्पेक्टरने शेवटी हे मानलं की,त्याला पांढऱ्या पाइनचा काही खास अनुभव नाही आहे आणि मग तो मला प्रत्येक तुकड्याबद्दल प्रश्न विचारू लागला.मी त्याला सांगत राहिलो की,हा तुकडा त्याच ग्रेडचा का येतो ज्या ग्रेडची ऑर्डर दिलेली आहे;पण मी हेही सांगत राहिलो की,जर त्यांना हे वाटतं की,हा बरोबर नाही आहे किंवा त्यांच्या कामाचा नाही आहे तर त्यांनी त्याला वेगळं ठेवावं.शेवटी तो या स्थितीत आला की प्रत्येक तुकड्याला रिजेक्ट करतेवेळी त्याला अपराधी वाटू लागलं होतं. शेवटी त्याला हे समजलं की,चूक त्याची होती कारण त्यांनी तितक्या चांगल्या ग्रेडच्या मालाची ऑर्डर दिली नव्हती,जितक्या चांगल्या ग्रेडची त्यांना जरुरी होती.याचा परिणाम असा झाला की, माझ्या तिथून परतल्यानंतर एकदा परत त्यांनी पूर्ण ट्रकच्या मालाची तपासणी केली.तपासणीनंतर त्याने पूर्ण मालाचा स्वीकार केला आणि पूर्ण पैशाचा चेक पाठवून दिला.या एका उदाहरणामुळे,थोड्याशा व्यवहार कुशलतेमुळे आणि समोरच्याची चूक न सांगितल्याच्या संकल्पामुळे,ना फक्त आमच्या कंपनीचा फायदा झाला तर सद्भावनाही मिळाली जी अनमोल होती. मार्टिन ल्यूथर किंगला जेव्हा विचारलं गेलं की,ते शांतीच्या पक्षात असूनसुद्धा देशाचे सगळ्यात मोठे अश्वेत ऑफिसर एअर फोर्स जनरल डेनियल 'चैपी' जेम्सचे प्रशंसक का आहेत,तर त्यांनी उत्तर दिलं की,
मी लोकांना त्यांच्या सिद्धान्ताच्या तराजूत तोलतो,आपल्या सिद्धान्ताच्या तराजूत नाही.
याच प्रकारे जनरल रॉबर्ट एकदा कॉन्फेडरेसीच्या प्रेसिडेंट जेफरसन डेव्हिससमोर आपल्या एका अधीनस्थ ऑफिसरच्या गोष्टीवर चकित झाला.त्याने म्हटले की,
जनरल,तुम्ही नाही जाणत की,तुम्ही ज्याची तारीफ करता आहात,तो तुमच्याविषयी शत्रुत्वाचा विचार करतो आहे आणि तुम्हाला नावं ठेवण्याची एकही संधी नाही सोडत ? जनरल लीने सांगितलं, " मला माहीत आहे;पण प्रेसिडेंटने त्याच्याविषयी माझे विचार विचारले होते,माझ्याविषयी त्याचे विचार नव्हते विचारले." तसा मी या धड्यात काही फार नवीन गोष्ट नाही सांगत आहे.
दोन हजार वर्षांआधी येशू ख्रिस्ताने सांगितलं होतं की, आपल्या विरोधकांशी तत्काळ सहमत व्हा.येशूच्या जन्माआधी २,२०० वर्षं आधी मिस्त्र सम्राट अख्तोईने आपल्या पुत्राला हीच समजदारीची शिकवण दिली होती, "कूटनीतिज्ञ बना.यामुळे लोक तुमची गोष्ट ऐकतील आणि तुम्हाला खूप फायदा होईल."
दुसऱ्या शब्दांमध्ये आपले ग्राहक, आपली पत्नी किंवा आपले विरोधक यांच्या बरोबर वाद घालू नका.त्यांना हे नका सांगू की ते चूक आहेत.बस,थोड्याशा कूटनीतीचा प्रयोग करा.